भटकंती : विश्वासातून जंगल संवर्धनाकडे
- Raj Lingayat

- Sep 17
- 1 min read
मंडणगडमध्ये ए.ई.आर.एफ. संस्थेचा प्रवास जरी फक्त तीन वर्षांचा असला तरी त्यामागचा संघर्ष, त्या संघर्षातून स्थानिक लोकांशी जुळलेलं नातं आणि त्या नात्याच्या पार्श्वभूमीवर उभं राहिलेलं ए.ई.आर.एफ. संस्थेचं फील्ड स्टेशन – अशी ही विश्वासातून जन्मलेली आमची भटकंती आहे.

सुरुवातीला हा परिसर आमच्यासाठी आणि स्थानिक लोकांसाठी अपरिचितच होता. गावोगाव जाऊन लोकांशी संवाद साधणं, निसर्गसंवर्धनाचं महत्त्व पटवून देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास निर्माण करणं – हे बोलायला जरी सोपं असलं, तरी प्रत्यक्षात अमलात आणणं तितकंच कठीण होतं. अनेक वेळा ग्रामसभेत आमचं बोलणं दुर्लक्षित केलं जाई; तर कधी थेट विरोधही केला जाई. “हे कोण? आमच्या जंगलात का आलेत? यामागे हेतू काय आहे?” असे प्रश्न संवाद साधताना लोकांच्या नजरेत दिसून येत.
गावकऱ्यांसाठी जंगल म्हणजे फक्त झाडं, गुरांना चारा, स्वयंपाकासाठी लाकूड आणि काही वर्षांनी तोडून त्यातून मिळणारी किंमत. अशा परिस्थितीत त्यांना जंगल संरक्षणासाठी तयार करणं सहजासहजी शक्य नव्हतं. त्यामुळे आमचं पहिलं काम होतं त्यांच्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन करणं. आठवडे-आठवडे, महिने-महिने आम्ही वारंवार एकाच गावात जात राहिलो. लोकांबरोबर वेळ घालवला, त्यांचं मनापासून ऐकलं आणि हळूहळू आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या सततच्या भेटीगाठींमुळे आमचं नातं दृढ होत गेलं आणि ग्रामस्थांच्या नजरेत आमच्याविषयी विश्वासाची पहिली किरणं उमटू लागली.
पेवे गावचे सरपंच श्री. विश्वनाथ टक्के आणि आंबवली गावचे खांबे काका हे आमच्या कामाला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद देणारे ठरले. त्यांनी आपापल्या खाजगी जंगलाचं संरक्षण करण्याचा निर्धार केला – खांबे काकांनी तब्बल १४ एकर, तर टक्के सरांनी २० एकर जंगल जतन करण्याचा निर्णय घेतला. ही केवळ करारपत्रांची नोंद नव्हती, तर ग्रामस्थांशी आमच्या नात्याचा पहिला ठोस पाया होता. या कृतीतून संपूर्ण गावकऱ्यांपर्यंत स्पष्ट संदेश गेला – “ही संस्था आपल्यासाठी, आपल्या जंगलासाठी काम करते.”
गावागावात संस्थेविषयी आणि संवर्धन उपक्रमांविषयी चर्चा सुरू झाली. शांतता आणि शंकेची जागा उत्सुकता आणि विश्वासाने घेतली. लोकांना कळू लागलं की डोंगरवाचं जंगल असो किंवा कांदळवन – प्रत्येक परिसंस्था महत्त्वाची आहे. आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या परिसंस्थांचं संवर्धन करणं अत्यावश्यक आहे. पैशासाठी जंगल तोडणं हा एकमेव मार्ग नाही; तर हिरवं, जिवंत जंगल जपूनही शाश्वत उत्पन्न मिळवता येऊ शकतं.

आज या बदलामुळे, मंडणगड तालुक्यात ए.ई.आर.एफ. संस्थेच्या प्रयत्नातून १००० एकरांहून अधिक खाजगी कांदळवन आणि ५५० एकरांहून अधिक खाजगी डोंगराळ जंगल पुढील दहा वर्षांसाठी संवर्धन करारांतर्गत संरक्षित आहे. गावागावात लोकांमध्ये संस्थेविषयी आणि आमच्याविषयी आपुलकीची भावना वाढत चालली आहे.
मागे वळून पाहिलं असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते — निसर्ग वाचवणं म्हणजे फक्त झाडं जपणं नव्हे; तर त्या झाडांच्या सावलीत वाढलेल्या नात्यांना, विश्वासाला आणि माणुसकीला जपणं आहे...
-राज




👌👌